सातारा -जिल्ह्यात विविध विलगीकरण कक्षात 52 संशयित दाखल झाले. त्यापैकी कराडमध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गाने (सारी) दाखल असलेल्या दोघांचा सोमवारी मृत्यू झाला. या दोन रुग्णांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात करोनाबाधीत रुग्णाच्या सहवासातील 4 नागरिकांना तर श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे 2 नागरिकांना व प्रवास करुन आलेल्या 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जण तर कराडच्या कृष्णा मेडिकलमधील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेजच्या विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यू श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुनेही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.