Satara | कलेढोण परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने उडवली नागरिकांची झोप

कलेढोण, (वार्ताहर) – कलेढोण परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात घोंगावणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याने नागरिकांची अक्षरशः झोप उडवली आहे. रात्रीच्या आठ वाजले की सर्वांचे डोळे आकाशाकडे लागून राहत आहेत. मायणी, खानापूर तालुक्यातील देवीखिंडी, गारळेवाडी, शिंदेमळा रानमळा परिसरातून याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
कोणताही उद्देश माहिती नाही, कोणतेही खास कारण नाही, कोणताही सर्व्हे नाही, परिसरात अजून तरी कोणतीही चोरीची अथवा इतर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही,
तरी देखील परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोन का फिरत आहेत, याचे कोडे कोणालाच उलगडता उलगडत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण झाल्या आहेत.
चोरट्यांना चोरी करता यावी यासाठी असे ड्रोनद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे की काय? चोरीच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरत असावेत व चोर चोऱ्या करत असावेत. बहुतांश भागात बंद असलेल्या घरफोड्या अनेकदा झाल्या आहेत.
परिसरात आजूबाजूला अनेक ठिकाणी नागरिकांनी संशयित चोर देखील पकडले आहेत. सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो त्यांच्याबद्दल खोटी माहिती व भीती पसरवली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
आकाशात घिरट्या घालणाऱ्या या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने नक्की काय पहात आहेत? हा कोणत्या कंपनीचा सर्व्हे आहे काय? चोरीच्या उद्देशाने केले जात असावे असे म्हणले तर चोऱ्या देखील होत नाहीत.
ज्या चोरीच्या घटना घडत आहेत त्यांचा या ड्रोनशी काहीच संबंध नसेल का? रेकी करून चोरी केली जात आहे की आणखी काय केले जात आहे असे एक न अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
ड्रोन आकाशात उडत आहेत. हे कृत्य का केले जात आहे? याचा उद्देश काय आहे. याची सर्व सखोल चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. परिसरात या ड्रोनचा वापरामुळे अजूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. त्यामुळे याची मनात भीती न बाळगता निश्चिंत रहा, असे असे पोलिस प्रशासनाकडू आवाहन केले जात आहे.
पोलीस प्रशासनाने तपास करावा
रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन दिसेल की तरुणांची पळापळ सुरू होत आहे. तरुण मंडळी रात्रभर जागून गावात गस्त घालत आहे.
मात्र त्यांना देखील संशयास्पद असे काही दिसत नाही. परंतु प्रत्येकांच्या मनात मात्र चोरट्यां विषयी असलेली भीती निर्माण झाली आहे.
सद्या शालेय विद्यार्थांच्या परीक्षेचा कालावधी आहे. येत्या काळात गणेशोत्सव देखील येत आहे. अशा वातावरणात आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने याबाबत कसून तपास करावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

