झारखंडमध्ये माओवाद्यांनी मोबाइल टॉवर उडवला

गिरीदिह – झारखंडमध्ये माओवाद्यांनी एक मोबाइल टॉवर उडवून दिला तर एका अन्य मोबाइल टॉवरला आग लावली. आज पहाटे झारखंडमधील गिरीदिह जिल्ह्यात हे टॉवर उद्ध्वस्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
माओवाद्यांचा वरिष्ठ नेता प्रशांत बोस याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी प्रतिकार सप्ताह घोषित केला आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी माओवाद्यांनी हे टॉवर लक्ष्य केले आहेत.
माओवाद्यांनी सर्वप्रथम खुखरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरटेल कंपनीचा टॉवर पेटवून दिला. दोन माओवादी या ठिकाणी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी या टॉवरला आग लावली असा अंदाज आहे. तर रात्री 1 च्या सुमारास माओवाद्यांनी जैनांचे तीर्थस्थान असलेल्या मधुबन येथील आयडिया कंपनीचा टॉवर बॉम्बने उडवून दिला.
माओवाद्यांना आता नेतृत्व उरले नसल्यामुळे आगतिकतेपोटी हे विध्वंसक कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर या भागातील माओवादीविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.





