जांबूत, (वार्ताहर)- शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना बेट भागातील जांबूत, चांडोह येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. जांबूत येथे ६८ टक्के मतदान झाले शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी बेट भागातील काठापूर, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाटके, वडनेर सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा मतदानासाठी प्रतिसाद दिसत होता. सकाळ, दुपारच्या टप्प्यातील मतदानानंतर संध्याकाळच्या शेवटच्या टप्प्यात सुमारास पावसाचे वातावरण तयार होऊन पाच वाजण्याच्या सुमारास जांबूत येथे तुरळक गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास जोरदार व नंतर हलक्या स्वरुपात पडणाऱ्या या पावसाने मतदानासाठी संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या मतदारांच्या मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी तुरळक पावसात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात सहा वाजण्याच्या अगोदर आलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, पिंपरखेड, फाटके, चांडोह, वडनेर या ठिकाणी ही सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याने मतदानावर काही अंशी परिणाम झाल्याचे चित्र होते.