पुणे – हडपसर येथील कापरे मळा परिसरात झालेल्या खूनाचा छडा लावण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. शिवीगाळ केल्याच्या कारणातून हा खून झाला असल्याचे पोलिस तपासातून समोर आलं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी अमोल बबन रजपूत (वय.34, माळवाडी हडपसर) याला अटक केली आहे.
दत्तात्रय साहेबराव कांबळे (वय.56,रा.माळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. एका शेतकर्याला त्याच्या शेतात मृतदेह आढळल्यानंतर त्याने याची माहिती हडपसर पोलिसांना दिली होती. पोलिसांनी प्रथम मृत कांबळे याची ओळख पटवली, यानंतर तपासाला सुरवात केली.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत करत असताना तांत्रिक विश्लेषन व परिसरातील साक्षीदाराकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत मयत दत्तात्रय कांबळे यांच्याबरोबर घटनेच्या दिवशी अमोल रजपुत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
मात्र सुरूवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतू शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच रजपूत याने सांगितले की, कांबळे यांने आपणार आई बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून त्याचा डोक्यात दगड घालून खून केला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सौरभ माने, पोलिस नाईक नितीन मुंढे, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, अकबर शेख, शिवले, पवार, यांच्या पथकाने केली.