गडचिरोलीत बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा

Gadchiroli | गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील रोपीनगट्टा या गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या २८ जणांपैकी पाच लहान मुले होते. या २८ लोकांना विषबाधा झाल्याचे कळताच विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, रोपीनगट्टा या गावातील सुरगु टेकाम यांच्या नातीचा नामकरण सोहळा घरी आयोजित करण्यात आला. यात मांसाहारी जेवणाचा बेत आखला गेला. पहिली पंगत उठल्यावर लगेच पंधरा मिनिटांनी जेवण केलेल्या व्यक्तींना उलटी आणि मळमळ होऊ लागली.
त्यानंतर अन्य भोजन पंगत थांबवण्यात आली आणि बाधितांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. काही बाधितांना छत्तीसगड राज्यातील नजीकच्या पाखंजूर येथेही हलविण्यात आले आहे. बाधितांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. तर यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत कुणीतरी मांसाहारी भोजनात मुद्दाम विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नेमक्या जेवणातील कुठल्या पदार्थातून विषबाधा झाली याचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे.





