चर्चेत : होर्मुझमधील नौदली संघर्ष
या युद्धातल्या नौदलाच्या लढ्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, कारण अमेरिकेचे सगळे (Strait of Hormuz) हल्ले नौदलाच्या एअर क्राफ्ट कॅरिअर स्ट्राइक ग्रुपवरून होत आहे.

– हेमंत महाजन
Strait of Hormuz : इराण व अमेरिका-इस्रायल युद्धाला एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्ताने या युद्धातल्या नौदलाच्या लढ्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, कारण अमेरिकेचे सगळे (Strait of Hormuz) हल्ले नौदलाच्या एअर क्राफ्ट कॅरिअर स्ट्राइक ग्रुपवरून होत आहे.
सध्याच्या इराण-अमेरिका संघर्षात अरबी आखात आणि होर्मुझ रास्ता हा नौदल आणि राजकीय रणभूमीचा केंद्रबिंदू बनला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या नौदलाचा विशेषतः विमानवाहक युद्धनौका वापर आणि इराण गनिमी कावा व लहान वेगवान नावांच्या रणनीतीचे विश्लेषण तसेच आखातीय नौदलांची भूमिका आणि यातून मिळणारे युद्ध धडे यावर विश्लेषण गरजेचे आहे.
2026च्या क्राइसिसमध्ये अमेरिकन नौदलाचा मुख्य आधार म्हणजे अनेक विमानवाहक युद्धनौका आधारित स्ट्राइक ग्रुप्स आहेत. या वेळी यूएसएनच्या अनेक सुपर कॅरियर्स-जसे की यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड, यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश. यांना इराणजवळच्या पाण्यात तैनात करण्यात आले आहे, जिथून त्यांची विमाने इराणच्या लष्करी आधार, रॉकेट/मिसाइल साइट्स आणि नौदली सुविधांवर हल्ले चढवू शकतात.
या नौसेनेची भूमिका फक्त हल्ला नसून अरबी आखातातील मित्र राष्ट्रांना सुरक्षा देण्याचीही आहे. विमानवाहक नौका ही एक भ्रमणशील विमानतळ म्हणून वापरली जाते, जिथून फायटर जेट्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विमाने, अथअउड आणि स्ट्राइक ड्रोन यांच्या माध्यमातून वायुसेना नौसेनेचा एकत्रित दबाव टाकता येतो. यामुळे अमेरिकेला दूरवर फायर करण्याची क्षमता मिळते.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखात क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि बहरिन यांसारख्या देशांची नौदले तैनात आहेत. मात्र, या संघर्षात त्यांची भूमिका प्रामुख्याने ‘सहकार्यात्मक आणि संरक्षणात्मक’ आहे.
लॉजिस्टिक सपोर्ट : हे देश अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय नौदलांना नियमित रसद पुरवतात. त्यांच्या हवाईतळांचा आणि बंदरांचा उपयोग अमेरिकन ‘सुपर-कॅरिअर्स’साठी लॉजिस्टिक हब म्हणून केला जातो.
किनारपट्टी सुरक्षा : त्यांनी आपली किनारपट्टी संरक्षण प्रणाली अधिक सक्षम केली आहे. इराणकडून येणार्या छोट्या नौकांच्या धोक्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे देश सातत्याने गस्त घालतात.
मर्यादा : या देशांच्या नौदलांनी इराणविरुद्धच्या थेट मोठ्या लष्करी कारवायांमध्ये सहभाग घेण्याचे टाळले असून, त्यांचे लक्ष केवळ व्यापारी मार्गांच्या सुरक्षेवर केंद्रित आहे.
इराणकडे अमेरिकेसारख्या महाकाय युद्धनौका नसल्या तरी, त्यांनी होर्मुझच्या क्षेत्रात असममित युद्धनीती अवलंबली आहे. इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स व इराणियन नेव्ही यांच्याकडे शेकडो स्पीड बोट्स आहेत. या नौका आकाराने लहान असल्या तरी त्या मशीनगन्स, रॉकेट लॉन्चर्स व जहाज-विरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.
इराणच्या रणनीतीचा मुख्य उद्देश अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय युद्धनौकांना दबावाखाली ठेवणे हा आहे. इराणच्या या वेगवान नौका आंतरराष्ट्रीय जहाजांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात किंवा त्यांच्या अगदी जवळ जाऊन चिथावणीखोर हालचाली करतात. या युद्धतंत्रात अनेक छोट्या नौका एकत्र येऊन एका मोठ्या युद्धनौकेला चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करतात.
अशा वेळी मोठ्या युद्धनौकेला आपली संरक्षक यंत्रणा, गोळीबार किंवा ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’चा वापर करावा लागतो. या छुप्या युद्धामुळे केवळ भौतिक नुकसानच नाही, तर मानसिक तणाव निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्थेला खिळ घालण्याचा प्रयत्न इराणकडून केला जातो. होर्मुझ रास्ता जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या चोक पॉइंट्सपैकी एक आहे, कारण यातून जगातील 20% इतके कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू जातात.
समुद्रामधील चोक पॉईंट ही संकल्पना जागतिक व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हा एक असा अरुंद समुद्री मार्ग असतो जिथून जहाजांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते, पण तो मार्ग इतका अरुंद असतो की तो सहजपणे रोखला जाऊ शकतो. दोन मोठ्या जलसाठ्यांना जोडणार्या या अरुंद पट्ट्याला सामुद्रधुनी किंवा चोक पॉईंट म्हणतात.
जर हा छोटा मार्ग बंद झाला, तर जहाजांना हजारो मैलांचा वळसा घालून जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि इंधनाचा खर्च प्रचंड वाढतो. फक्त 21 मैल रुंदीचा हा समुद्रमार्ग जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही तेलवाहतूक जहाजांना नुकसान झाले, विमा खर्च वाढले आणि व्यापारी जहाजे अडकली. युद्धनीतीमध्ये चोक पॉईंटवर नियंत्रण मिळवणे म्हणजे संपूर्ण जगाची ‘लाइफलाइन’ कापण्यासारखे असते.
इराण आणि पश्चिम आशियातील तणावात होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात धोकादायक चोक पॉईंट बनला आहे. जेव्हा जेव्हा अमेरिका किंवा पाश्चात्य देशांकडून इराणवर निर्बंध लादले जातात किंवा लष्करी दबाव वाढतो, तेव्हा इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देतो. जागतिक व्यापारावर परिणाम करून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी चोक पॉईंट्सचा वापर ‘स्ट्रॅटेजिक वेपन’ म्हणून केला जातो.
शत्रू देशाला मिळणारे अन्न, इंधन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा या मार्गावर ताबा मिळवून रोखता येतो. थोडक्यात, चोक पॉईंट्स हे समुद्रातील असे ‘गळा आवळण्याचे’ ठिकाण आहेत, ज्याचा ताबा ज्याच्याकडे असेल, तो जागतिक अर्थव्यवस्था आणि युद्धभूमीवर वरचढ ठरू शकतो.






