– दीपाली कांबळे AI : 2027 पर्यंत 10 लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षण देण्यात येईल. एआय लिटरसी फॉर टीचर्स या उपक्रमाद्वारे शिक्षकांना अध्यापन, शैक्षणिक सामग्री निर्मिती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा (AI) वापर शिकवला जाईल. आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढत आहे. उद्योग, आरोग्य, बँकिंग, पत्रकारिता, प्रशासन या क्षेत्रांनंतर शिक्षणक्षेत्रही त्यापासून दूर राहू शकत नाही. विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत बदलली आहे. आजची पिढी माहिती पाठ करण्यापेक्षा माहिती शोधणे, समजून घेणे आणि तिचा वापर करणे याला अधिक महत्त्व देते. अशा परिस्थितीत पारंपरिक अध्यापन पद्धती पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे (AI) ही काळाची गरज बनली आहे. एआय शिक्षकांसाठी अनेक दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. शिक्षकांचा मोठा वेळ प्रश्नपत्रिका तयार करणे, नोट्स बनवणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रगतीची नोंद ठेवणे अशा प्रशासकीय कामांमध्ये जातो. एआयमुळे (AI) ही कामे जलद आणि अचूक पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्यासाठी आणि सर्जनशील अध्यापनासाठी वेळ मिळू शकतो. AI विशेषतः ग्रामीण व कमी संसाधन असलेल्या शाळांमध्ये अध्यापन सामग्रीची कमतरता असते. एआयच्या मदतीने स्थानिक भाषांमध्ये, विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप आणि आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार करता येऊ शकते. परंतु या चित्राची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. तंत्रज्ञान हे कधीच पूर्णपणे तटस्थ नसते. ते समाजातील असमानता वाढवूही शकते. भारतासारख्या विषम समाजात एआय शिक्षणामध्ये आणताना अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये अजूनही इंटरनेट, संगणक, वीज आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. अनेक शिक्षकांकडे स्मार्टफोन किंवा डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण नाही. अशा परिस्थितीत एआयचा लाभ काही शहरांपुरता आणि खासगी शाळांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. आजही शिक्षणात मोठी डिजिटल दरी दिसून येते. महानगरातील विद्यार्थ्यांकडे टॅब, लॅपटॉप, हाय-स्पीड इंटरनेट आणि डिजिटल कौशल्ये आहेत; तर ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गासाठी नेटवर्क शोधावे लागते. कोविड काळात ही दरी स्पष्टपणे दिसून आली. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले, तर काही विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांद्वारे प्रगती केली. एआयच्या नव्या युगात ही दरी आणखी वाढली तर शिक्षणातील समानतेचे स्वप्न धोक्यात येईल. एआयच्या वापरामुळे शिक्षकांची भूमिकादेखील बदलणार आहे. पारंपरिक अर्थाने ज्ञान देणारा शिक्षक आता मार्गदर्शक आणि सहप्रवासी बनणार आहे. कारण, माहिती विद्यार्थ्यांना इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. पण कोणती माहिती खरी, कोणती दिशाभूल करणारी, कोणती नैतिकदृष्ट्या योग्य हे समजावून सांगण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षक फक्त विषयतज्ज्ञ असून चालणार नाही; त्यांना डिजिटल साक्षरता, तर्कशक्ती, भावनिक संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव असणे आवश्यक ठरणार आहे. एआयमुळे शिक्षण अधिक डेटा-केंद्रित होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची शिकण्याची गती, आवड, परीक्षा निकाल, वर्तन यांचे विश्लेषण एआयमुळे होऊ शकते. हे एका बाजूला उपयुक्त वाटत असले तरी विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांचा डेटा कोणाकडे राहणार? त्याचा वापर कसा होणार? खासगी कंपन्या शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण मिळवतील का? हे प्रश्न गंभीर आहेत. शिक्षण हे फक्त बाजारपेठ नाही; ते लोकशाही आणि सामाजिक न्यायाशी संबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे एआयचा वापर करताना स्पष्ट नैतिक आणि कायदेशीर चौकट आवश्यक आहे. भारतातील शिक्षणव्यवस्थेचा सामाजिक संदर्भ लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. जात, वर्ग, लिंग, भाषा आणि प्रदेश यांच्या आधारावर शिक्षणामध्ये आधीच असमानता आहे. एआय प्रणाली बहुतेक वेळा इंग्रजीकेंद्रित असतात. त्यामुळे स्थानिक भाषा, बोलीभाषा आणि आदिवासी ज्ञानपरंपरा दुर्लक्षित राहण्याचा धोका आहे. जर एआय फक्त शहरी, इंग्रजी माध्यमातील अनुभवांवर आधारित असेल, तर तो ग्रामीण किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या वास्तवाला समजून घेऊ शकणार नाही. त्यामुळे भारतीय संदर्भात स्थानिक ज्ञान, भाषिक विविधता आणि सामाजिक वास्तव समजणारी एआय प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही; ती मानवी नातेसंबंधांची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना प्रेरणा देणे, आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या अडचणी ओळखणे ही भूमिका कोणतेही मशीन पूर्णपणे निभावू शकत नाही. एआय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते; पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील भीती, न्यूनगंड किंवा स्वप्ने समजून घेण्याची मानवी संवेदनशीलता त्याच्याकडे नसते. म्हणूनच भविष्यातील शिक्षणामध्ये एआय हे सहाय्यक साधन असू शकते, शिक्षकांचा पर्याय नाही. काहीजण एआयमुळे शिक्षकांच्या नोकर्यांवर संकट येईल अशी भीती व्यक्त करतात. परंतु वास्तवात पाहिले तर भारतात अजूनही शिक्षकांची मोठी कमतरता आहे. अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असते. अशा वेळी एआय शिक्षकांना मदत करू शकते. मात्र, त्यासाठी सरकारने प्रशिक्षणासोबत पायाभूत सुविधा, इंटरनेट, स्थानिक भाषांमधील सामग्री आणि सातत्यपूर्ण तांत्रिक मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एआय शिक्षणाला अधिक वैयक्तिक स्वरूप देऊ शकते. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने शिकतो. काही विद्यार्थी दृश्य माध्यमातून शिकतात, काही श्रवणातून, तर काही प्रत्यक्ष कृतीतून. एआय विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार सामग्री तयार करू शकते. त्यामुळे मागे पडणार्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मदत मिळू शकते. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही एआय उपयुक्त ठरू शकते. भाषांतर, आवाजावर आधारित साधने, टेक्स्ट-टू-स्पीच यांसारख्या सुविधा शिक्षण अधिक समावेशक बनवू शकतात. मात्र शिक्षकांवर वाढणारा मानसिक ताणही लक्षात घ्यावा लागेल. नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा दबाव, सतत बदलणारी साधने आणि कामगिरी मोजण्याच्या डिजिटल पद्धती यामुळे अनेक शिक्षकांना असुरक्षित वाटू शकते. विशेषतः वयस्कर शिक्षकांना ही प्रक्रिया अवघड जाऊ शकते. त्यामुळे प्रशिक्षण फक्त तांत्रिक नसून संवेदनशील आणि सहकार्यात्मक असले पाहिजे. शिक्षकांना तुम्ही मागे पडत आहात असे वाटण्याऐवजी तुम्ही बदलाचे भागीदार आहात अशी भावना निर्माण करणे महत्त्वाचे आहे.