– हेमंत देसाई ऍलोपॅथीच्या नावाने शिमगा करणाऱ्या रामदेवबाबा व त्यांचे सहयोगी आचार्य बालकृष्ण यांना स्वतःला ऍलोपॅथीचा आश्रय घ्यावा लागला होता. त्याबाबत… योगगुरू बाबा रामदेव हे कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. डॉ. मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना, काळ्या पैशाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या बाबांनी तेथे पोलीस येताच घाबरून सलवार-कमीस घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी रामदेवबाबांनी पेरियार ई. व्ही. रामस्वामी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांना “बौद्धिक दहशतवादी’ असे संबोधले होते. त्यावेळी अनेक दलित व आदिवासी कार्यकर्त्यांनी पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. “कोरोनिल’ हे औषध करोनाविरोधी प्रभावी औषध असल्याचा दावाही करण्यात आला, त्याविरुद्धही देशविदेशातून जोरदार आक्षेप घेण्यात आला. कोविड झालेल्या रुग्णांना श्वासोच्छ्वास नीट कसा करावा, हेदेखील कळत नाही आणि हीच मंडळी प्राणवायू व औषधांची चणचण आहे, स्मशानभूमीत जागा नाही अशा प्रकारची नकारात्मकता पसरवत असतात, अशी टीका रामदेवबाबांनी केली होती. त्यांची ही टिप्पणी अत्यंत असंवेदनशील असल्याची टीका देशभरातून झाली. आता मध्यंतरी बाबांना ऍलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर तुफानी टीका झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर बाबांविरुद्ध मोहीम सुरू झाली असून, त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मात्र, “अटक तर त्यांचा बापही करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया बाबांनी दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचवेळी “कुणीतरी या बिझिनेसमनला म्हणजेच रामदेवबाबांना कोणत्याही कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आमच्या डॉक्टर व फ्रंटलाइन वर्करसोबत 24 तास उभे राहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, संतापजनक आणि घृणास्पद आहे. हे कोणाच्या टूलकिटप्रमाणे काम करताहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?’ अशी टिप्पणी प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी केली आहे. बाबा हे भाजप व पंतप्रधानांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना असे बोलण्याचे धाडस होत असल्याचे नेटकऱ्यांना वाटते. रामदेवबाबांवर साथरोग कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍलोपॅथी हे एक मूर्ख विज्ञान आहे, असे मत बाबांनी व्यक्त केले होते. बाबांच्या कोरोनिलच्या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पतंजली प्रकल्पासाठी विदर्भात प्रचंड जमीनही देण्यात आली. भाजपचे अनेक नेते व माजी मुख्यमंत्र्यांची बाबांशी जवळीक आहे. मात्र, ऍलोपॅथीवर टीकास्त्र सोडणाऱ्या बाबांना अखेर माफीनामा सादर करावा लागला. बाबांच्या शरीरातील अनेक घटक कमी झाले होते, तेव्हा त्यांना सलाइन सोल्युशन्स व व्हिटॅमिन्स द्यावे लागले होते. ज्यांना डी-हायड्रेशनचा धोका असतो व त्यातून मृत्यू होण्याचीही शक्यता असते, अशा लोकांना सलाइन सोल्युशन दिले जाते. बाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती दोन वर्षांपूर्वी बिघडली व ते बेशुद्ध पडले. तेव्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली होती. परंतु एम्समध्ये ऍलोपॅथी डॉक्टरांनीच त्यांच्यावर उपचार केले. आपल्यावर सरकारचा वरदहस्त असल्यामुळे आपले कोणी काही करू शकत नाही, असे रामदेवबाबांना वाटत असावे. परंतु गेल्या आठवड्यात आयएमएचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. एका वाहिनीवरील चर्चासत्रात डॉ. लेले यांनी पतंजलीच्या कोरोनिलची विश्वासार्हता काय, असा थेट सवाल रामदेवबाबांना केला. बाबा, तुम्हाला ऍलोपॅथीमधले काय माहीत आहे? तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे का? असे सवाल त्यांनी केले. बाबा मध्ये बोलू लागताच, “कीप क्वाएट. आय ऍम टॉकिंग,’ असे डॉ. लेले यांनी त्यांना चढ्या स्वरात बजावले. तरीदेखील बाबांची बडबड सुरूच राहिल्यावर, “जस्ट शटअप,’ असे ते खेकसले. तुम्ही बोगस दावे करता आणि वनौषधींच्या मिश्रणांसंबंधी काहीपण सांगत राहता, अशी टीकाही त्यांनी केली. आयएमएचे देशात तीन लाख ऍलोपॅथिक डॉक्टर सदस्य आहेत. ऍलोपॅथिक औषधे घेऊन, लाखो रुग्ण मेले आहेत, असा आरोप बाबांनी केल्यामुळे, डॉ. लेले साहजिकच संतापले होते. रामदेवबाबांसारख्या व्यक्तींवर देशद्रोहाच्या आरोपावरूनच कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांच्यासारखे लोक करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर्सचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम करत आहेत, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. या योगगुरूकडून उत्तराखंडच्या आयएमए विभागाने एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. डॉ. लेले नावाच्या मराठी व्यक्तीने योगगुरूंविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखवले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. डॉ. लेले हे मूळचे कोल्हापूरचे असून, ते अतिशय निर्भय आहेत, असे त्यांचे सहकारी सांगतात. डॉ. लेले यांचे क्लिनिक मुंबईत मालाड येथे आहे. ते 1978 पासून फॅमिली फिजिशियन म्हणून काम करतात. गेली अनेक वर्षे ते वेगवेगळ्या वैद्यकीय संघटनांत सक्रिय आहेत. यापूर्वी आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. डॉ. लेले हे नेहमीच विवेकपूर्ण व नैतिक भूमिका घेत असतात. डॉक्टरी पेशाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी व्हावा हा त्यांचा दृष्टिकोन असतो, असे सांगितले जाते. डॉ. लेले हे टेक्नोसॅव्हीदेखील आहेत. सरकारी संबंधांचा वापर करून आपले महासाम्राज्य उभे करणाऱ्या आणि त्याचवेळी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या योगगुरूला जागेवर आणण्याची हिंमत डॉ. लेलेंनी दाखविली आहे.