रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागून अवघे चार दिवस उलटत नाहीत, तोच शहरात रक्ताचा सडा पडला आहे. माजी नगरसेवक आणि शिंदे गटाच्या विद्यमान नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज (२६ डिसेंबर) सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण खोपोली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मुलाला शाळेत सोडून परतताना झाला ‘घात’- मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून घराकडे परतत होते. यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तोंड बांधलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला इतका भीषण होता की काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर कारमधून पसार झाले. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने शहरात भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांविरुद्ध जनक्षोभ – या हत्येनंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. मंगेश काळोखे यांनी आधीच आपल्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना कळवले होते, तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. यामुळे संतप्त जमावाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खोपोली शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजकीय वैरातून हत्या? भरत गोगावलेंचा गंभीर आरोप या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री आणि आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “२१ तारखेला निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर लगेच ही हत्या होणे ही दुर्दैवी बाब आहे. हा सर्व प्रकार राजकीय वैरातून घडला असून, यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असावा,” अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंसह 10 जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.