मुंबई : नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी 21 डिसेंबर 2025 रोजी आणि काही नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करावी आणि अशा काही घटना घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदान आणि मतमोजणीच्या तयारीबाबत गेल्या दोन दिवसांत (१६ आणि १७ डिसेंबर) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह आयोगातील इतर अधिकारी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी आणि त्याची माहिती तात्काळ प्रसारमाध्यमांना द्यावी. तसेच राज्य निवडणूक आयोगालाही अहवाल पाठवावा. कारवाईची माहिती मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांना वेळेत न मिळाल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो, ही बाब टाळण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले की, २० डिसेंबरला मोजक्या ठिकाणी मतदान होत असले तरी २१ डिसेंबरला सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी होईल. निकालानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणांनी परस्पर समन्वय साधावा. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० नंतर इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमांतून प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. याबाबत सर्व संबंधितांना स्तरावरून सूचना द्याव्यात. पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले की, मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. घटना घडल्यानंतर कारवाई होते; मात्र ती लोकांसमोर येत नाही, त्यामुळे चुकीचे चित्र निर्माण होते. हे टाळणे गरजेचे आहे.