बीडमध्ये सर्वाधिक 36 उमेदवार रिंगणात- तर गडचिरोली-चिमुरमध्ये फक्त 5 उमेदवार

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघापैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 36 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तर गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बीडमध्ये सर्वाधिक उमेदवार असल्याने येथे मतदानासाठी तीन बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्याने राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा 7 मतदारसंघात 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 30 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार गडचिरोली-चिमूर मध्ये आमने-सामने उभे ठाकले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा दहा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात बीडमध्ये सर्वाधिक म्हणजे 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने निवडणूक आयोगाला येथे मतदानासाठी तीन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 10 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदारसंघ आणि उमेदवारांची संख्या –
पहिला टप्पा : वर्धा-14, रामटेक-16, नागपूर-30, भंडारा गोंदिया-30, गडचिरोली-05, चंद्रपूर-13, यवतमाळ वाशिम-24
दुसरा टप्पा : बुलढाणा-12, अकोला-11, अमरावती-24, हिंगोली-28, नांदेड-14, परभणी-17, बीड-36, उस्मानाबाद-14, लातूर-10, सोलापूर-13

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here