पुणे: घरातील लोक बाहेर गावी गेले असल्याचे पाहून घराच्या दरवाजाचे मुख्य लॉक तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात असणारे सोन्याचे दागिने, कॅमेरा, घड्याळ आणि १० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना बाणेर गावातील प्रेमराज अपार्टमेंट मध्ये घडली आहे.
या संदर्भात जया रमेश कुमटेकर यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकूण २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जया कुमटेकर या शुक्रवारी त्यांच्या दुसऱ्या घरी म्हणजे गुलमोहर पार्क इथे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कडील सर्व डाग दागिने हे घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. त्यानंतर त्या रविवारी प्रेमराज अपार्टमेंट मधील घरी परत आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार चतुःशृंगी पोलीस सटेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक गुन्हेच्या वैशाली गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांनी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण हे करत आहेत.