Bangladesh | Sheikh Hasina – बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सातत्याने फास आवळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने गुरुवारी अधिकाऱ्यांना पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांची सर्व भाषणे मीडिया आणि सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले.
शेख हसीना यांनी नुकत्याच दिलेल्या भाषणानंतर हा आदेश आला आहे. चार महिन्यांपूर्वी बांगलादेशातून पळून गेल्यावर त्यांनी पहिले जाहीर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी देशाचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांच्यावर नरसंहार केल्याचा आणि हिंदूंसह अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
बांगलादेश संगाबाद संस्था म्हणजे बीएसएसने या आदेशाच्या संदर्भात सांगितले की, न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुजा मजुमदार यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय न्यायाधिकरणाने हा आदेश दिला आणि अधिकाऱ्यांना हसीना यांची सर्व द्वेषपूर्ण भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर भविष्यात सर्व प्रकारच्या व्यासपीठांवर त्यांच्या भाषणांचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचला अशा सूचना केल्या आहेत.
वृत्तसंस्थेशी बोलताना, फिर्यादी वकील अब्दुल्ला अल नोमान म्हणाले की, न्यायाधिकरणाने आयसीटी विभागाच्या सचिवांना, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगाला (बीटीआरसी) आदेशाचे त्वरित पालन करण्यास सांगितले आहे. फिर्यादी पक्षाने यापूर्वी एक याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये पदच्युत पंतप्रधानांच्या सर्व प्रकारच्या भाषणावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
ही भाषणे साक्षीदारांना किंवा पीडितांना धमकावू शकतात किंवा तपासात अडथळा आणू शकतात, असा दावा करण्यात आला होता. प्रसारमाध्यमांना या संदर्भात माहिती देताना सरकारी वकील गाझी एमएच तमीम म्हणाले की, द्वेषयुक्त भाषण देणे हा केवळ बांगलादेशातच नाही, तर जगभरातील प्रत्येक कायद्याने आणि प्रत्येक देशात फौजदारी गुन्हा आहे.