लाहोर : इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा सरकारने द्यावा, अशी मागणी इम्रान यांचे पुत्र कासिम खान यांनी पाकिस्तान सरकारकडे केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून कासिम खान यांनी ही मागणी केली आहे. इम्रान खान यांची अदियाळा तुरुंगात हत्या करण्यात आली असल्याचे बोलले जाते आहे. महिन्याभरापासून त्याचे कुटुंबीय, वकिल आणि त्यांच्या पक्षाच्या पदधिकाऱ्यांनाही त्यांना भेटू दिले जात नाही आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित असून गेल्या दोनवर्षांपासून त्यांना रावळपिंडीतील अदियाळा तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या भेटीची परवानगी मिळावी यासाठी त्यांच्या तीन बहिणी आणि खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सौहेल आफ्रिदी अदियाळा तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. इम्रान खान यांना एकांतवासात ठेवले गेले असून न्यायालयाच्या आदेशांनंतरही त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाही आहे. ते जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळू शकलेला नाही. इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलची सत्यस्थिती दडवून ठेवली जाते आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार, प्रशासन कायदेशीर उत्तरदायी आहे, असेही कासिम खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांना देण्यात येणाऱ्या अमानवी वर्तनाबद्दल आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील केले आहे. इम्रान यांच्या बहिणींना त्यांना भेटू न दिल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा पीटीआयने दिला आहे.