नवी दिल्ली – तोशकाना प्रकरणी दोषी ठरवले जाण्याच्या न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी इम्रान खान यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने परत पाठवली आहे. या आव्हान याचिकेबरोबर इम्रान खान यांनी सादर केलेली कागदपत्रे अपूर्ण आहेत. ही कागदपत्रे पूर्ण करून नव्याने ६ जानेवारी रोजी ही आव्हान याचिका सादर करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी म्हटले आहे.
इम्रान खान यांना तोशकाना प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ५ ऑगस्ट रोजी दोषी ठरवले असून त्यांना ३ वर्षांची शिक्षा आणि १ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.या निर्णयानंतर इम्रान खान यांना ५ वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद स्विकारण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
या निर्णयावर इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला इम्रान खान यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली गेली होती.