Imran Khan : इम्रान यांच्या दोन बहिणींची तुरुंगातून सुटका; पंजाब सरकारने अटकेचे आदेश घेतले मागे
पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान (Imran Khan) यांच्या दोन बहिणींची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली.

Imran Khan : पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान (Imran Khan) यांच्या दोन बहिणींची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. पंजाब सरकारने त्यांच्या अटकेचे आदेश मागे घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीटीआयच्या नेत्यांनी दिली.
पीटीआयचे ज्येष्ठ नेते मुनीस इलाही यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उझमा खान आणि नोरिन नियाझी यांची कोट लखपत तुरुंगातून सुटका झाली आहे. मात्र, इम्रान खान (Imran Khan) यांची मोठी बहीण अलीमा खान अद्याप तुरुंगात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचीही लवकर सुटका व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पीटीआयचे नेते झुल्फी बुखारी यांनी दोन बहिणींच्या सुटकेचे स्वागत केले; मात्र खान कुटुंबावरील अन्याय संपलेला नसल्याचे सांगितले. तिन्ही बहिणींना सप्टेंबरमध्ये सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन करण्यापासून त्यांना रोखणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचा पीटीआयचा आरोप आहे.
दरम्यान, २०२३ पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांची बुधवारी त्यांच्या वकिलांनी भेट घेतली. त्यांना रक्तदाब आणि दृष्टीसंबंधी समस्या जाणवत असल्याचे वकील लतीफ खोसा यांनी सांगितले. यापूर्वी डोळ्यांच्या उपचारांसाठी त्यांना इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे नेण्यात आले होते.






