लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी फिल्ड मार्शल जनरल आसिम मुनीर यांच्यावर पुन्हा एकदा कडवट भाषेत टीका केली आहे. मुनीर हे पाकिस्तानमधील सर्वाधिक अत्याचारी हुकुमशहा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक अत्याचारी हुकुमशहा आसिम मुनीर आहेत. ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. त्यांच्या राजवटीतील जुलूमशाही अभूतपूर्व आहे. मुनीर यांना सत्तेची हाव आहे आणि ते काहीही करू शकतात. दिनांक ९ मे, २६ नोव्हेंबर आणि मुरिदके येथे सुरक्षा दलाने तेहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईदरम्यान थेट गोळीबार करून पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. निःशस्त्र नागरिकांवर बेछुट गोळीबार केला जाण्याचा सुसंस्कृत समाज कधीही विचारही करू शकत नाही. अन्य कोणाच्याही कालखंडामध्ये महिलांवरील एवढी क्रूरता बघितली गेली नाही. आपल्यावर दबाव आणण्यासाठीच आपली पत्नी बुशरा बिबी यांना एकांतवासामध्ये ठेवण्यात आले आहे. अशा गुलामगिरीपेक्षा मरण पत्करायला आम्ही तयार आहोत. आपण स्वतः आणि आपल्या पत्नीविरोधात शक्य तेवढे अन्याय आसिम मुनीर करत आहेत. एवढा त्रास कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या कुटुंबियांना दिला गेला नसेल. पण तरी मी मुनीर यांच्यापुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही, असेही इम्रान खान यांनी सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.