नवी दिल्ली – रुपया घसरत आहे. यामुळे ज्या वस्तूंची भारत आयात करतो त्या वस्तू महाग होणार आहेत. त्यामध्ये खनिज तेलाचा समावेश आहे. यामुळे देशातील एकूणच महागाई वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच रुपया घसरल्यामुळे माहिती तंत्रज्ञान, औषध, कपडे या क्षेत्रातील निर्यातदारांची निर्यात आणि नफा वाढणार आहे. या पातळीवर संतुलनाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ज्या आयात वस्तू सर्वसामान्य लोक वापरतात अशा वस्तू महाग झाल्यानंतर जनतेवर त्याचा परिणाम होतो असा युक्तिवाद करून विरोधी पक्षांनी संसदेत या विषयाकडे लक्ष वेधले. विशेष म्हणजे जगातील इतर सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत होत असतानाच फक्त भारतीय रुपयाच्या विरोधात बळकट होत आहे या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. आगामी काळात रुपया आणखी घसरण्याची शक्यता वाटत असल्यामुळे आयात करणारे आणि भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार डॉलरमध्ये आपला नफा काढून घेत आहेत. त्याचा रुपयावर जास्त परिणाम होत आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की, रुपयाचे घसरणे माहिती तंत्रज्ञान, कापड उद्योग, औषधी उद्योग इत्यादी निर्यात करणार्या उद्योगांना नफादायक ठरत आहे. तर सोन्याची आयात करणार्या दागिने उद्योगासह खनिज तेलाची आयात महागात पडणार आहे. जर खनिज तेलाची आयात महागात पडली तर इंधनाचे दर वाढतील आणि देशातील महागाई वाढू शकते. त्यामुळे रुपया नेमक्या कोणत्या पातळीवर असावा याचा निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे. दरम्यान अमेरिकेला होणारी निर्यातीची तुट भरून काढण्यासाठी भारताला पर्यायी देशात निर्यात करावी लागणार आहे. रुपयाच्या सध्याच्या पातळीवर ही निर्यात वाढविणे शक्य नाही. यासाठी रिझर्व बँक रुपयाचे अवमूल्यन काही प्रमाणात होऊ देत आहे असे समजले जात आहे. 2025 मध्ये आतापर्यंत रुपयाचे पाच टक्के अमूल्यन झाले आहे. आणखी तीन टक्के अवमूल्यन झाल्यानंतर रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी रिझर्व बँक प्रयत्न करेल असे समजले जाते. रुपयाच्या मूल्यात सुधारणा दरम्यान डॉलर इंडेक्स कमकुवत झाल्यामुळे आणि रिझर्व बँकेने काही प्रमाणात हस्तक्षेप केल्यामुळे गुरुवारी रुपयाचा भाव 19 पैशांनी वधारून 89.96 रुपये प्रति डॉलर या पातळीवर स्थिरावला. डॉलर इंडेक्स घसरून 98.84 अंकावर आल्यामुळेही रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र परकीय गुंतवणूक परत जाण्याचे प्रमाण कमी न झाल्यामुळे रुपयावरील दबाव कायम राहणार आहे.