पुणे – ‘विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा’ अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा लाडक्या विठुरायाच्या भेठीला निघाला आहे. आज (दि. 12) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहरात दाखल होणार आहे.
यंदा या सोहळ्यात भाविकांची संख्या ही लक्षणीय असणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळा दि. 12 जून रोजी आळंदीहून पुणे मुक्कामी राहील. दि. 14 रोजी सासवडकडे प्रस्थान ठेवेल. दि. 15 रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथेच राहिल. आणि त्यानंतर हरिनामाचा गजर करीत सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होईल.
दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ होणारे रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल,
तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. आणि सामान्य पुणेकरांना देखील वाहन चालवताना कोणतेही अडचण येणार नाही. असं नियोजन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.