नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कौटुंबिक पेन्शन (Family Pension) संदर्भात केंद्र सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DoPPW) मृत कर्मचाऱ्याच्या माता-पित्यांना मिळणाऱ्या पेन्शनबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नव्या नियमानुसार, पेन्शनची वाढलेली रक्कम (Enhanced Rate) पालकांना मिळत राहावी यासाठी, त्यांना ‘जीवन प्रमाण पत्र’ (Life Certificate) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाढलेली पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ‘लाइफ सर्टिफिकेट’ आवश्यक, नेमका बदल काय? आता मृत कर्मचाऱ्याच्या दोन्ही हयात असलेल्या माता-पित्यांना वाढीव दराने पेन्शन (जे शेवटच्या पगाराच्या ७५% असते) मिळत राहण्यासाठी प्रत्येकाला (Individual) दरवर्षी स्वतंत्र जीवन प्रमाण पत्र (Life Certificate) जमा करावे लागेल. पेन्शन वितरीत करणाऱ्या अधिकृत संस्था (उदा. बँक किंवा पोस्ट ऑफिस) येथे हे प्रमाणपत्र मॅन्युअली किंवा डिजिटल पद्धतीने सादर करता येईल. नवीन नियमाची गरज का भासली? यापूर्वी, स्पष्ट निर्देशांच्या अभावामुळे अनेक प्रकरणांमध्ये जास्त रक्कम दिली जात होती. एका पालकाचा मृत्यू झाल्यानंतरही, दुसऱ्या पालकाला चुकीने वाढीव दराने पेन्शन मिळत राहत होती. हा गैरप्रकार आणि आर्थिक विसंगती (Overpayment) टाळण्यासाठी, तसेच प्रणालीमध्ये अधिक अचूकता आणि जबाबदारी आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. वाढलेल्या पेन्शन दराचा नियम काय सांगतो? DoPPW च्या नवीन नियमांनुसार, मृत कर्मचाऱ्याच्या माता-पित्यांना मिळणारी पेन्शन खालीलप्रमाणे असेल: दोन्ही पालक हयात असतानाच ७५% दराने पेन्शन मिळेल. एका पालकाचा मृत्यू झाल्यास, पेन्शन आपोआप ६०% दरावर येईल. जीवन प्रमाणपत्र कधी जमा करायचे? सामान्यतः, पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. परंतु, ८० वर्षांवरील आणि त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी दरवर्षी १ ऑक्टोबरपासून प्रमाणपत्र जमा करण्याची विशेष सोय उपलब्ध आहे.