Pimpri : डीपी प्लॅन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

देहूगाव : नगरपंचायतीच्या विकास आराखड्याच्या (डीपी प्लॅन) अनुषंगाने बुधवारी (दि. ३१) दुपारी नगरपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रशस्त रस्ते, उद्यान, वाहनतळ, विश्रामगृह, रुग्णालय आदी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये विकास कामांसाठी लागणाऱ्या जमिनी, शासकीय गायरान भूखंडांचा वापर, आणि रेड झोनसारख्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.
देहू गाव ग्रामपंचायतीचे ८ डिसेंबर २०२० रोजी नगरपंचायतीत रूपांतर झाले. तेव्हापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनधिकृत बांधकामे आणि नियोजनशून्य वसाहती वाढल्याने सार्वजनिक सुविधांच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विकास आराखड्याच्या माध्यमातून पुढील वर्षभरात डीपी प्लॅन तयार केला जाणार असून, त्यामध्ये एसटीपी प्लांट, प्रशस्त जलकेंद्र, वाहनतळ, रुग्णालय, ग्रंथालय, विश्रामगृह, विद्युत उपकेंद्र, नगरपंचायतीची प्रशस्त इमारत आदी सुविधा उभारण्याचा समावेश आहे. मात्र, अनेक जमिनी रेड झोनमध्ये येत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी न घेता शासकीय गायरान जमिनीचा वापर करण्याचा पर्याय चर्चेला आला.
तसेच, नागरिकांच्या जमिनींवर जर आरक्षण लागणार असेल, तर त्यांना योग्य मोबदला अथवा टीडीआर देण्याची मागणीही बैठकीत झाली. विकास कामांना गती देण्यासाठी रस्ते व वसाहतींसाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर डीपी प्लॅन तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीतून देण्यात आली.
या बैठकीत नगर रचनेचे सहाय्यक संचालक अभिजीत केतकर, नगर रचना विभागाचे मंगेश देशपांडे, सहाय्यक प्रतीक भांगे, अधिकारी सुरेंद्र आंधळे, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक,नगरसेविका आणि संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते.





