आबुधाबी –आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांदरम्यान होणारी आजची लढत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
साखळीतील अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर हैदराबादने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असून या सामन्यातील कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. अर्थात विराट कोहलीच्या नेतृत्वखालील बेंगळुरू संघाने जरी नशिबाच्या जोरावर या गटात स्थान मिळवले असले तरीही कागदावर त्यांचाच संघ बलाढ्य दिसत आहे.
हैदराबादची फलंदाजी कर्णधार वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा यांच्यार अवलंबून असली तरीही त्यांना वॉर्नर वगळता अन्य चारही फलंदाजांचे अपयश सतावत आहे. पहिल्या काही सामन्यांत अपयशाचा धनी ठरलेला वृद्धिमान साहा भरात आल्याने वॉर्नरला दिलासा मिळाला असला तरीही त्यांना मुंबईच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे.
जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन व राहुल चहर यांच्या गोलंदाजीसमोर या स्पर्धेतील जवळपास सर्वच फलंदाज अडखळताना दिसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या स्पेलचा सामना हैदराबादचे फलंदाज कसे करतात यावरच त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे बेंगळुरूला आपल्या फलंदाजी व गोलंदाजीत अत्यंत गंभीरपणे कामगिरी करावी लागणार आहे. त्यांच्या देवदत्त पडीक्कल, जोश फिलीप्स व एबी डीविलियर्स यांनी सातत्य राखले असले तरीही कर्णधार कोहली, शिवम दुबे व ऍरन फिंच यांना महत्त्वाच्या सामन्यात येत असलेल्या अपयशावर मात करावी लागणार आहे.
त्यात नवोदित गुरकीरतसिंग मान भरात असल्याने कोहलीच्या संघाला काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र, कोहली, पडीक्कल व मान वगळता त्यांच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर वेगाने धावा करण्यात आलेले अपयश त्यांना मारक ठरले आहे. त्यामुळे त्यांना हैदराबादचा स्टार गोलंदाज रशीद खानचा सामना करण्यासाठी नवी योजना तयार करावी लागणार आहे.
डीविलियर्स व पडीक्कल लक्षवेधी
हैदराबादच्या माऱ्यासमोर एबी डीविलियर्स व देवदत्त पडीक्कल लक्षवेधी ठरणार आहेत. बेंगळुरूला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना याच दोन फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येणार आहे. या दोघांनी सातत्य राखल्यामुळे या दोन पॉवर हिटर्सला हैदराबाद रोखणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात बेंगळुरूला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. गेली बारा वर्षे कोहलीच्या संघावर चोकर्स हा शिक्का बसलेला आहे. ही अपयशाची मालिका खंडित करण्याची त्यांना नामी संधी आहे.
दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने स्पर्धेचे एकदा विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. यंदाही त्यांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. मात्र, बेअरस्टो व केन विल्यमसन यांचे अपयश त्यांना या सामन्यात तरी दूर करता येणार का हाच मोठा प्रश्न आहे.