लक्षवेधी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व

-विलास पंढरी

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने मराठी माणसाच्या दृष्टीने या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे.स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी “संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, पश्‍चिम व मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग नवीन राज्यात येणे अभिप्रेत होते. अनेक सरकारे आली आणि गेली पण कर्नाटकात गेलेला भाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रखर लढ्यानंतरही राज्यात येऊ शकलेला नाही.

साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली होती व अजूनही चालू आहे. 1960 मध्ये महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. आता काही जिल्ह्यांचे विभाजन होऊन ही संख्या 36 झाली आहे. 1960 मध्ये राज्यातील साक्षरतेचे प्रमाण केवळ 35 टक्‍के होते. ते आता ग्रामीण भागात 80 टक्‍क्‍यांवर आणि शहरी भागात 90 टक्‍क्‍यांवर गेले आहे.

महाराष्ट्र भूमी जवळपास सर्व जातींच्या संतांची असून छत्रपती शिवराय, संभाजीराजे, थोरले बाजीराव पेशवे असे योद्धे, शाहू महाराज, लो. टिळक, न्या. रानडे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, फुले, आगरकर, गोखले, एस. एम. जोशी असे समाजसुधारक, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे असे साहित्यिक, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी असे भारतरत्न विजेते आणि बाळासाहेब ठाकरे, कॉम्रेड डांगे असे लढवय्ये अशा अगणित नररत्नांची खाण आहे.

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये “राष्ट्र’ या नावाने संबोधले गेले आहे. म्हणजेच महाराष्ट्राची परंपरा अतिप्राचीन असल्याचे स्पष्ट होते. अशोकाच्या “राष्ट्रिक’ आणि नंतर “महा राष्ट्र’ या नावाने ओळखले जाऊ लागले, असे चिनी प्रवासी ह्युयान त्संग यांनी केलेल्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या शब्दावरून पडले असावे अशीही शक्‍यता आहे. काहींच्या मते, हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण करताना संयुक्‍त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याचेही स्मरण करणे आज उद्‌बोधक ठरेल. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसे बिथरल्याने 21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. सरकारचा निषेध करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून घोषणा देत येत होता. फ्लोरा फाउंटनकडे निघालेला मोर्चा पोलीसबळ वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, जिगरबाज सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले.

पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात 105 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. त्यात सर्वच जातीधर्माची नावे असून दोन स्त्रियांचीही नावे आहेत. म्हणजे तेव्हाही मुंबई कॉस्मोपोलीटन होती हे लक्षात येते. काही तज्ज्ञांच्या मते त्या वेळी 107 आंदोलक हुतात्मा झाले.

कामगार दिनाची पूर्वपीठिका

दरवर्षी जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

कामगार दिन का सुरू झाला?

औद्योगिक क्रांतीने कामगारांना रोजगार मिळू लागला; परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 14 तास मजुरांना राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली. 1891 पासून 1 मे हा कामगारदिन पाळण्याची प्रथा सुरू झाली.

कायद्याने 8 तासांचा दिवस, बालमजुरीला बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, रात्रीचे व धोक्‍याचे काम यासाठी खास नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तूच्या रूपात न देता नगद द्यावा, समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य अशा कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

अनेक वर्षांनंतर अधिकाधिक देशांतील कामगार 1 मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्‍याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशांतील शहरांमध्ये लाखो कामगार 1 मे दिन साजरा करू लागले. 1 मे दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्‍याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणाऱ्या मानवाच्या पिळवणुकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार 1 मे ला होऊ लागला.

1 मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. 1905 च्या 1 मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या आपल्या पत्रकात, तमाम औद्योगिक देशांतील कामगारांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रथम लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.