nagar | प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी कागदोपत्रीच!

नगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने शहरातील व्यापार्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. दुकानांमध्ये कॅरिबॅग आढळून आल्यास संबंधिताला ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. असे असले तरी शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा (कॅरिबॅग) सर्रास वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणासह आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी कॅरिबॅगचा खच पडलेला दिसतो. त्यामुळे शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील व्यापार्यांची बैठक घेऊन त्यांना कॅरिबॅग विक्री व वापर तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु या सूचना नंतर कागदोपत्रीच उरल्या. कॅरिबॅगसह इतर प्लॅस्टिकची विक्री आणि वापर करणार्यांवर आतापर्यंत कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. परिणामी शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे.
७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या, प्लास्टिक काड्यांसह कानकोरणी, फुग्यांच्या कांड्या, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी, आइस्क्रिम कांड्या, सजावटीसाठी लागणारे पॉलिस्टिरीन (थर्माकोल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, काटे- चमचे चाकू, स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभोवतीची फिल्म, पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी) यावर बंदी आहे.
५ हजारांचा होणार दंड
प्रत्येक दुकानदाराने कॅरिबॅगची विक्री बंद करावी. प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी देखील आहे. दुकानांमध्ये कॅरिबॅग आढळून आल्यास संबंधित दुकानदाराला जागेवरच ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.





