इस्रोचा शास्रज्ञ असल्याची तोतयेगिरी ! सूरतमधील एका शिक्षकावर अटकेची कारवाई

नवी दिल्ली – “चांद्रयान-3′ यशस्वी झाल्यानंतर जगभरातून इस्रोच्या शास्रज्ञांचे कौतुक करण्यात येत असतानाच सुरत येथील एका शिक्षकाने तोतयेगिरी करत इस्रोमध्ये शास्रज्ञ असल्याचे भासवित कथितपणे भूमिका मांडली होती. तसेच “चांद्रयान-3′ मोहिमेत लॅंडर मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावाही केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मितुल त्रिवेदी असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याने सुरत शहरातील त्याच्या खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इस्रोचा शास्त्रज्ञ म्हणून तोतयागिरी केली, असे पोलिसांनी सांगितले. “चांद्रयान-3’चे मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावा करत स्थानिक माध्यमांना मुलाखत देताना दिसल्यानंतर त्रिवेदी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद सिंघल म्हणाले, त्रिवेदी हे शिक्षक असून त्यांनी आपल्या खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी माध्यमांसमोर इस्रोचे शास्त्रज्ञ म्हणून भूमिका मांडली. याबाबत तपास केला असता आरोपी मितुल त्रिवेदीचा इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेशी कोणत्याही प्रकारे संबंध नव्हता. त्याने इस्रोचा कर्मचारी असल्याचा केलेला दावाही खोटा असून त्याने दाखविलेले ओळखपत्रही बनावट असल्याची माहिती त्यांनी दिली.

