बॅंकिंग क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम

नवी दिल्ली – सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बॅंकांनी सुरू केलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस एच वेंकटचलम यांनी सांगितले की, गुरुवारी संपामुळे 20.4 लाख धनादेश वठू शकले नाहीत. या धनादेशातील रकम 18,600 कोटी रुपयांची होती. सरकारी बॅंकांच्या कर्मचाऱ्यानी संप केला असला तरी खासगी बॅंकांच्या कामावर मात्र कसलाही परिणाम झाला नाही.
व्यंकटचलम म्हणाले की, सरकारी बॅंकांनी भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. शेती, छोटे व्यापारी, लघु उद्योग, वाहन आणि गोरगरिबांच्या विकासाला सरकारी बॅंकांनी मदत केली आहे. मात्र खासगीकरणामुळे आर्थिक विकासाला बाधा पोहोचेल. म्हणून 7 लाख बॅंक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी संप केला.
बॅंक कर्मचाऱ्याच्या संपाला कॉंग्रेस, द्रमुक, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. सरकारने अगोदरच आयडीबीआय बॅंकेचे खासगीकरण केले आहे. त्याचबरोबर 14 बॅंकांचे परस्परांमध्ये विलीनीकरण केले आहे.





