व्यापार युद्धाचा शेअर निर्देशांकांवर परिणाम

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडाच्या आयातीवर 25% तर चीनच्या आयातीवर दहा टक्के शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत इतर देश अमेरिकेसंदर्भात काही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली. खनिज तेलाचे दर वाढले. या घडामोडीमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळपासून बरीच विक्री झाली. परिणामी निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 319 अंकांनी कमी होऊन 77,186 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 749 अंकांनी कोसळला होता. मात्र नंतर त्यामध्ये सुधारणा झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 121 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी कोसळून 23,361 अंकावर बंद झाला.
लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयटीसी, पावर ग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. अशा परिस्थितीतही बजाज फायनान्स, महिंद्रा, बजाज फिन्सर्व, भारती एअरटेल, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
काल अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादा सात लाखावरून बारा लाख रुपये केल्यानंतर शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित होते. मात्र दरम्यानच्या काळात अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यामुळे परदेशातील गुंतवणूकदाराबरोबरच देशातील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा अमेरिकेसह सर्व जगाला त्रास सहन करावा लागणार आहे, विविध देशातील शेअर आणि चलन बाजारात कमालीची अस्थिरता रेगाळणार आहे, अशा परिस्थितीत गुंतवणूकदार कुंपणावर बसून राहण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकन निर्देशांक घसरले –
अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यानंतर त्याचा परिणाम इतर देशांबरोबरच अमेरिकेवरही होणार आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा दुराग्रह कायम आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच कमी झाले. युरोप आणि आशिया खंडातील दक्षिण कोरिया, जपान, हाँग कँाग, शांगाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांकही कमी झाले.
भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक परत जात असून शनिवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 1,327 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेने आयात शुल्क वाढविल्यानंतर अमेरिकेतही वस्तू महाग होऊन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा अमेरिकेच्या शेअर बाजारावर परिणाम होत आहे. त्यातच फेडरल रिझर्वने व्याजदर कपात केलेली नाही आणि आगामी काळातही करणार नसल्याचे सांगितले आहे.




