198 मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध
मुंबई- लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा दुपटीनहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198 निवडणूक चिन्हे “मुक्त चिन्हे’ (फ्री सिम्बॉल्स) घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते.
दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे.