Pune District : वडिलांच्या स्मृती जतनासाठी रक्षाविसर्जन अन् वृक्षारोपण
Pune District : सेवानिवृत्त महादेव बनकर यांना शेतीची विशेष आवड होती. शेतातील माती, झाडे, पिके आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळत असे. वडिलांचा हाच निसर्गप्रेमाचा वारसा पुढे नेत कुटुंबीयांनी शेतात आंबा, चिंच आणि नारळाची रोपे लावली.

कडूस : दोंदे येथील महादेव लक्ष्मण बनकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी बनकर कुटुंबीयांनी शेतात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर उरलेली रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात लावलेल्या रोपांच्या मातीत मिसळण्यात आली.
सेवानिवृत्त महादेव बनकर यांना शेतीची विशेष आवड होती. शेतातील माती, झाडे, पिके आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळत असे. वडिलांचा हाच निसर्गप्रेमाचा वारसा पुढे नेत कुटुंबीयांनी शेतात आंबा, चिंच आणि नारळाची रोपे लावली. या रोपांच्या लागवडीवेळी रक्षा मातीत मिसळून वडिलांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी दोंदे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत रक्षा नदीत विसर्जित न करता पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाचे पालन करत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेश बनकर यांनी वडिलांची रक्षा भावपूर्ण वातावरणात शेतातील मातीत मिसळली. अशा प्रकारे त्यांनी कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वडिलांच्या स्मृतींची जिवंत स्मारके म्हणून ही झाडे वाढविण्याचा संकल्प बनकर कुटुंबीयांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले.





