पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते सफाईची जी निविदा राबविली आहे, त्यामध्ये सहभागी झालेले ठेकेदार हे संगणमताने रिंग करून सहभागी झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून, हे नुकसान टाळण्यासाठी ही निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.
कलाटे यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या देशावर, राज्यावर व शहरावर करोनाचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी सर्वांचाच आर्थिक डोलारा अडचणीत येणार आहे. शासनाने अंदाजपत्रकाच्या 33 टक्के खर्चाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच नव्या निविदा काढण्यासही बंदी आणलेली आहे. असे असतानाही यांत्रिकीकरणाची निविदा ही अत्यावश्यक व करोना निर्मूलनासाठी असल्याचे भासवून राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्यास महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची भीती असून अनेक कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळी ही निविदा राबविण्याची घाई न करता तात्काळ रद्द करण्यात यावी, असेही कलाटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.