“मला खेद वाटतो..”; पीटी उषा यांच्या वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदी संतापल्या

दिल्ली – भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकर्त्यांचे शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी समर्थन केले आहे. याशिवाय त्यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पीटी उषा यांच्या वक्तव्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत लिहिले की, “मला खेद वाटते मॅडम, आपण एकत्रितपणे आमच्या खेळाडूंसाठी बोलले पाहिजे, त्यांची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करू नये. ते आमच्या देशाला आणि आम्हाला अभिमानाचे कारण देतात. लैंगिक छळाचे आरोप असलेले खासदार पळून जातात आणि पीडितांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा देशाची प्रतिमा खराब होते. आपण महिला खेळाडूंसाठी एकत्रितपणे बोलले पाहिजे, पीटी उषा यांनी हे समजून घेतले पाहिजे.”
Country’s image is tarnished when we have MPs accused of sexual harassment going scot free while the victims have to struggle for justice.
Am sorry Ma’m we must collectively speak up for our sportswomen not accuse them of tarnishing image when they are the ones who won laurels… pic.twitter.com/Gp9mCA1ZVc— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 28, 2023
काय म्हणाल्या होत्या पीटी उषा ?
‘‘कुस्तीगिरांनी आमच्याकडे येण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्त वागणुकीचे लक्षण आहे. त्यांनी देखरेख समितीचा चौकशी अहवाल समोर येण्याची वाट पाहणे गरजेचे होते. त्यांनी उचललेले पाऊल योग्य नाही. लैंगिक शोषणाच्या तक्रारींसाठी ‘आयओए’ची समिती आणि खेळाडूंचा आयोग आहे.”
“कुस्तीगिरांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्याकडे येणे आवश्यक होते. हे केवळ कुस्तीपटूंसाठीच नव्हे तर खेळासाठीही चांगले नाही, त्यांना काही शिस्तही असली पाहिजे. कुस्तीगिरांच्या कृतीमुळे भारताची प्रतिमा खराब झाली आहे,’’ असे पीटी उषा म्हणाल्या होत्या.





