पनवेल – पनवेलमध्ये लाखो रुपयांचा गुटख्याचा अवैध साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई करंजाडे येथे करण्यात आली. या कारवाईत 1,83,636 रुपये किंमतीची गुटख्यांच्या पाकिटांसह सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. विरेंद्र बुद्धसेन गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता, घरामध्ये सुद्धा प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीच्या आधारे माहिती प्राप्त करून करंजाडे येथे छापा टाकून विरेंद्र गुप्ता या आरोपीला अटक केली आहे.