अवैध वाळू, वाहनांसह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाठार स्टेशन -सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मळकी नावाच्या शिवारात छापा टाकून अवैध वाळू उपसा करून दोघांना अटक केली. या कारवाईत अवैध वाळू व वाहने मिळून तब्बल 46 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहीगाव ते घिघेवाडी या गावांच्या दरम्यान मळकी नावाच्या शिवारात वाळूचा अवैध उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेथे छापा टाकला.
यावेळी वाळू उपसा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. अवैधरित्या उपसा केलेली 50 ब्रास वाळू, एक पोकलेन, दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर, एक महिंद्रा बोलेरो जीप, एक मोटारसायकल, एक डंपर, एक जेसीबी, असा एकूण 46 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांवर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या पथकामध्ये कॉन्स्टेबल मनोज शिंदे, वैभव शिंदे, शुभम चव्हाण, निलेश जांभळे, इंद्रजित भोसले, प्रकाश मेश्राम, राजकुमार घोरपडे, अमोल गिरी यांच्याह आदींनी सहभाग घेतला.





