Purandar : वीर मार्गावर बेकायदा विद्युत वाहिनी
Purandar : अनेक ठिकाणी रस्त्याच्या गटार, शेताच्या बांधावर हे खांब उभे केले जात आहेत. पिलाणवाडी येथे होत असलेल्या खडी मशीनसाठी हा विद्युत पुरवठा केला जाणार आहे. खासगी व्यावसायिकांना वीज जोडणीच्या बाबतीत महावितरण कंपनी तत्परता दाखवते तशी सेवा शेतकऱ्यांच्या बाबतीत कधीच मिळत नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

परिंचे : वीर (ता. पुरंदर) येथे सासवड रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या विद्युत लाइनला नागरिक, प्रवाशांनी तीव्र विरोध केला आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत लोखंडी खांब उभारणी सुरू असून काम त्वरित न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा नवलेवाडी, घारमळकरवाडी, परिंचे, यादववाडी येथील नागरिक व शेतकऱ्यांनी दिला. भविष्यात धोके असून विद्युत लाइनला विरोध असल्याचे प्रभाकर यादव व अमित यादव यांनी सांगितले आहे.
वीर, सासवड रस्त्यावर राऊतवाडी ते पिलाणवाडी दरम्यान विद्युत लाइनचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लाइनचे खांब रस्त्या लगतच्या साईड पट्टीवर उभारले आहेत. त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होणार असून अपघाताची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या गटार, शेताच्या बांधावर हे खांब उभे केले जात आहेत. पिलाणवाडी येथे होत असलेल्या खडी मशीनसाठी हा विद्युत पुरवठा केला जाणार आहे. खासगी व्यावसायिकांना वीज जोडणीच्या बाबतीत महावितरण कंपनी तत्परता दाखवते तशी सेवा शेतकऱ्यांच्या बाबतीत कधीच मिळत नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
वीर-सासवड रस्त्या राज्यमार्ग असल्याने भविष्यात रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून अशा प्रकारच्या लाइन कडेने गेल्यास भविष्यात शासनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात प्रभाकर यादव यांनी म्हटले आहे. परिंचे परिसरात शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर दोन वेळा बैठका झाल्या. शेतकरी व ग्रामस्थांना विश्वासात न घेता या लाइनचे काम सुरू असून महावितरणचे अधिकारी दडपशाही करीत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी नवलेवाडीचे माजी सरपंच किसन वाघोले, शामकांत वाघोले, सोमनाथ गिरमे, सतीश घारमळकर, सुभाष नवले, सुनील कचरे आदी शेतकरी उपस्थित होते.
महावितरणकडून एकमेंकावर ढकलाढकली
संदर्भात उप कार्यकारी अभियंता शरद औताडे यांच्याशी संपर्क साधला असता महावितरण कंपनीने या कामाला रितसर मंजुरी दिली असल्याने हे काम सुरू आहे. सहाय्यक अभियंता विजयकुमार कचरे या कामाची जबाबदारी व पाहणी करत असल्याचे सांगितले आहे. विजयकुमार कचरे यांच्याशी संपर्क साधला असता लाइन उभी करण्याचे काम खासगी संस्थेला दिले असल्याचे सांगितले आहे. तन्वी इलेक्ट्रिकल संस्थेला हे काम दिले असून या संस्थेचे राहुल हरपळे यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्याआधी काम कसे सुरू केले असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
बांधकाम विभागाकडून परवानगीच नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाची शाखा अभियंता प्रकाश निगडे यांना विचारले असता राऊतवाडी ते पिलाणवाडी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या विद्युत लाइनला बांधकाम विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही. हे काम बेकायदेशीर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नसल्याचे सांगितले आहे.





