पिंपरी चिंचवड – पूर्णानगर येथे बेकायदा पार्किंग

पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग धोरण पाण्यात गेले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा कररुपी पैसा खर्च करून देखील शहरातील अनधिकृत पार्किंगचा प्रश्न सुटताना दिसून येत नाही. पूर्णानगर येथील पिंपरी-चिखली मार्गावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग सुरू आहे. परंतु याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे.
पूर्णानगर येथील जुन्या आरटीओ समोर मोठ्या प्रमाणावर अवजड आणि चार चाकी वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. या ठिकाणी दिवसरात्र बेकायदा पार्किंग सुरू आहे. परंतु या ठिकाणी आरटीओचे अधिकारी अथवा वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे येथे दिवसेंदिवस बेकायदा पार्किंग करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. समोरच टाटा मोटर्सची कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगार या ठिकाणी गाड्या लावून कामावर जात आहेत. तर स्थानिक व्यावसायिकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडे येणारा ग्राहक देखील रस्त्यात गाडी लावून जात आहे. त्यामुळे पूर्णानगर येथील सर्व्हिस रस्ता आणि पिंपरी-चिखली मुख्य मार्गावर वाहने लावण्यात येत असल्याने पूर्णानगर चौकात व चिखलीकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पूर्णानगर परिसरात मागील काही वर्षांपासून येथे अनधिकृत वाहन पार्किंग सुरू आहे. पूर्वी थोड्या प्रमाणात येथे गाड्या पार्क केल्या जात. परंतु सध्या साधारण अर्धा किलोमीटरच्या आसपास वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रात्री येथे मद्यपी दारू पीत बसतात. त्यामुळे येथून महिलांना ये-जा करताना भीती वाटत आहे. त्यामुळे येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे गरजेचे आहे.
– सारिका पवार, अध्यक्षा, एकता प्रतिष्ठान.
रात्रीस दारुड्यांचा अड्डा
जुन्या आरटीओ परिसरात अवजड वाहने पार्क केली जातात. या वाहनांजवळच टवाळखोर रात्री दारूच्या बाटल्या रिचवत बसलेले असतात. तसेच जुन्या आरटीओ परिसरात देखील मद्यपी दारू पीत असल्याने येथून ये-जा करताना महिलांना असुरक्षित वाटत आहे.
चिखली पोलीस स्टेशन समोरच गाड्यांच्या रांगा
पूर्णानगर बीआरटी स्टेशनजवळ तसेच चिखली पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूला अवजड वाहने दिवसरात्र लावण्यात आलेली असतात. परंतु याकडे चिखली पोलीस अथवा स्थानिक नेतेमंडळी ना वाहतूक नियंत्रण पोलीस लक्ष देताना दिसत नाहीत. त्यामुळे पूर्णानगर चौक ते खाली पेट्रोल पंपापर्यंत सेवा रस्ता व मुख्य रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग वाढत चालली आहे.





