सविंदणे – शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील बेकायदेशीर सावकारी करून सर्वसामान्यांना नाडणाऱ्या सावकाराच्या घरावर छापा टाकत कागदपत्रे जप्त केली. त्याच्यावर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला’ अशी अवस्था सावकाराची झाली आहे. सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहायक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत जप्त केलेले खरेदीखत दस्तावेज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवहीमध्ये व्यक्तींना व्याजाने पैसे दिल्याबाबतच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. विलास रंगनाथ चोरे यांच्या तक्रारी अर्जावरून घरामध्ये सापडलेल्या कागदपत्रामुळे सहायक निबंधक कार्यालयातील दीपक यशवंत वराळ यांनी बेकायदेशीर सावकारी व्यवसाय केल्याचे निदर्शनात आल्याने शिरूर पोलिस स्टेशनला सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सादर केलेल्या खरेदीखत दस्तऐवज क्रमांक 329/2020 नुसार लिहून देणार विलास रंगनाथ चोरे व लिहून घेणार- सुरेश रभाजी चोरे यांचे मूळ खरेदीखत व लाल रंगाची धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या खतावणी नोंदवहीमध्ये अर्जदार यांचा मुलगा सतीश विलास चोरे यांना व्याजाने पैसे दिल्याबाबतची नोंद आहे. इतर व्यक्तींना व्याजाने पैसे दिल्याबाबतच्या नोंदी खतावणीमध्ये आढळलेल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करीत आहेत. नोंदवहीवरून पर्दाफाश अर्जदार विलास चोरे यांनी सहायक निबंधक कार्यालयात दाखल केलेल्या मूळ अर्जासोबतच्या कागदपत्रांवरुन तसेच घरझडतीवेळी मिळालेले दस्तावेज व नोंदवहीतील नोंदीवरून सुरेश रभाजी चोरे हे बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करीत आहेत, असे दिसून आले. त्याच्यावर शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.