वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ज्यो बायडेन यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील आपल्या सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचे आयोजन केले होते.
या वेळी बोलताना ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ते 2024 ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन, असे म्हटले आहे. याच वाक्यामुळे ट्रम्प यांनी आता थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.
ही चार वर्षे खूपच छान होती, असे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटले. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. ट्रम्प यांनी याच सदस्यांना उद्देशून, आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावीत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असेच आत्ता सांगू शकतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, ट्रम्प हे 20 जानेवारी 2024 रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. मागील आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी आपले वकील 2020 चे निकाल बदलू शकले नाहीत तर आपण 2024 ची निवडणूक लढू असे म्हटले होते. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांचीच चलती असेल, असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.