राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्याची आचारसंहिताही लागू झाली असून राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत तर प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतली आहे. मात्र, कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकरी दुष्काळी स्थितीमुळे पुरता हैराण झाला असून या निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाने मधल्या काळात दिलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे अनेक ठिकाणी पेरणी केलेले पीक सलग दुसऱ्या वर्षी मोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. थोड्याफार पावसावर आलेल्या पिकांवरही रोगराईने हल्ला केल्याने नुकसान झाले आहे. चारा म्हणून असणारे पीक मका हे तर नाकतोडा व लष्करी अळीने पुरते उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा एक ना अनेक समस्यांमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय पक्षाचे पुढारी, नेते लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. आज पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.