सातारा -जिल्ह्यातील आणखी आठ जणांचा करोना रिपोर्ट गुरूवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 579 झाली आहे. त्यापैकी 254 रुग्ण बरे झाले आहेत. तर 301 रुग्णांवर उपचार सुरु असून करोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 31 जणांचे रिपोर्ट गुरूवारी निगेटिव्ह आले तर 161 जणांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या 16 नमुन्यांपैकी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय पुरुष करोनाबाधित आला असून उर्वरित 15 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल 3 जून रोजी पाठविण्यात आलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमधील 16 जणांचे नमुन्यांसह एकूण 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे
त्यापूर्वी गुरूवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सात जण पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये कराड तालुक्यातील खराडे 15 वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय महिला तसेच कारंडवाडी (देगाव रोड, ता.सातारा) येथील 65 वर्षीय महिलेटा समावेश आहे.
हे सात रिपोर्ट बुधावरी रात्री उशिरा प्राप्त झाले. येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 23, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 28, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 14, खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील 52, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयील 33 व रायगाव येथील 11 असे एकूण 161 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या एन. सी. सी. एस. यांच्याकडे तपासणीकरीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.