“…तसं पाहिलं तर मी देखील गुन्हेगारच आहे, मी तरी कुठे”; बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी बोलताना उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकच्या माध्यमातून सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण स्वत: कमी पडल्याची कबुली दिली. मी सुद्धा गुन्हेगार असल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी २५ वर्ष युतीत सडल्याचाही उल्लेख पुन्हा एकदा केल्याचे पहायला मिळाले. तसेच आता कार्यकर्त्यांनी मार्चमधील निवडणुकांसाठी तयार रहावे असंही मुख्यमंत्री म्हणाले
शिवसेना इतर पक्षांप्रमाणे स्थानिक निवडणुका गांभीर्याने घेत नसल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. “आपलं खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असे असते. लोकसभा जेवढ्या जिकरीने लढवतो तेवढ्या जिकरीने या निवडणुका आपण लढवत नाही. माझ्यासह जे मंत्री आहेत, जिल्हाप्रमुख आहेत ते या निवडणुकांकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे तसं देतात का?,” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
“मी पण तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मी तरी कुठे फिरलो. या वेळेचा भाग वेगळा होता. पण आपल्या एखाद दुसऱ्या नेत्याने सोडलं तर कोणी लक्ष दिलेलं असेल असं वाटत नाही. हे यापुढे टाळलं पाहिजे. गेल्या दोन वर्षांत दोन विधानपरिषदा आपल्या आपण हारलो आहोत. त्या कशा हरलो?,” असा प्रश्न उद्धव यांनी शिवसैनिकांना विचारला.
“काही जण सांगतात की तुमच्यातच गद्दार निघाले. जसं शिवसेना प्रमुख म्हणायचे आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात आहे, असं माझं मत नाही. असेल तर त्याने बिनधानस्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही. जे शिवसैनिक कट्टर आहेत त्या शिवसैनिकांच्या मदतीने, मग ते मूठभर राहिले तरी चालेल. त्या मूठभर शिवसैनिकांच्या मदतीने त्यांच्या मूठीमध्ये अभिमानाची आणि स्वाभीमानाची तलावर देऊन जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही, या जिद्दीने मी मैदानात उतरलोय,” असं उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान म्हटलं आहे.





