दोन नंबर कराल तर टायर मध्ये जाल ; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी

बारामती : दोन नंबर कराल तर टायरमध्ये जाल, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. बेशिस्त वागणाऱ्यांना टायरात घालून मारा, असे निर्देशच त्यांनी पोलिसांना दिले. बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे (दि.१२) बारामतीच्या दौऱ्यावर होते. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.
शहरातील सुविधा आणि बेशिस्तपणाबद्दल पवार यांनी नागरिकांचे कान टोचले. ते म्हणाले की, काही काहीजण चुका करीत आहेत, रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करून सांगतो. आता ती जनावर कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. जे मालक आहेत, त्यांना निर्वाणीचा इशारा देतो. ऐकलं तर ठीक, नाही तर मालकांवर केसेस होतील. बारामती जी चांगली करतो, ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही, असेही त्यांनी शहरवासियांना फटकारले.
बेशिस्त तरूणांना दम देताना पवार म्हणाले की, कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की, त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा आहे. बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना यावेळी पवार यांनी चांगलेच फैलावरच घेतले.
वडिलांना विसरु नका
पवार म्हणाले की, मी बारामतीला होतो, तेव्हा पहिलं आईकडे जातो. बारामतीला आल्यावर आईकडे गेलो, दर्शन घेतले गप्पा मारल्या. प्रत्येकाने आईशी प्रेमाने आपलेपणाने वागावं. आपण आपल्या आई- बापामुळे आहोत. जीवात जीव असेपर्यंत आई-बापाला विसरू नका. नवीन पिढीतील काही जण आई बापाकडे नीट बघत नाहीत, त्यांना सांगतो हे वागणं बरं नव्हं, असे म्हणत पवारांनी आई-वडिलांच्या मुलांप्रतीच्या त्यागाबद्दल त्यांनी वडिलकीचा सल्ला दिला.





