पुणे | कठोर परिश्रमाची तयारी असल्यास यश मिळतेच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुरू स्वतःच बनून निर्णयक्षमता वाढवावी. प्रामाणिक हेतू व कठोर परिश्रमाची तयारी असल्याच यश नक्कीच मिळते, असे मत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री व जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले आहे. जेएसपीएम विद्यापीठात उगम – २०२४ या दुसऱ्या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी, कुलगुपू प्रा. बी. बी. आहुजा, डॉ. अजित थेटे, विशाल चौधरी, डॉ. महेश बुरांडे, डॉ. अनुराधा देशपांडे, डॉ. आर. एस. देशपांडे, डॉ. प्रभासिंग शर्मा, डॉ. सागर वानखेडे, अर्पिता कासवा, डॉ. दत्तात्रय भिसे आदी उपस्थित होते.
व्यावसायिक प्रोत्साहन व रोजगार निर्मिती हे जेएसपीएमचे उद्दिष्ट असून, सामान्य चौकट मोडून स्वतःचा विकास, स्वअध्ययन, स्वनिर्मिती झाली पाहिजे.
सेल्फ लर्निंग लॅब ही संकल्पना आयआयटीच्या धर्तीवर अंमलात आणणार आहे. शैक्षणिक दर्जा वाढविणे व सुसंस्कृत युवा पिढी तयार करून देशाच्या सामाजिक प्रगतीत योगदान देणे गरजेचे बनले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचेही प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
एकाच संकुलात विविध अभ्यासक्रम उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी अनेक विषयांत पारंगत असतील व इंटरडिसिप्लिनरी धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.





