Sanjay Raut On Amit Shah| जम्मू काश्मीरमध्ये डोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जम्मू काश्मीर, मणिपूरमधील घटनेला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, थोडी जरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी संजय राऊतांनी केली. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. तिच विटी आणि तोच दांडू, तेच गृहमंत्री जे पाच वर्ष अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, ज्यांच्याकडून काहीच ठोस कार्य झाले नाही. अमित शाह देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणात व्यस्त आहेत. अमित शाह देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, धमक्या देणं याच्यात व्यस्त आहेत. अमित शाह आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात,” असा टोला देखील संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला आहे. “अमित शाह यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी लावली ती ताकद जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. Sanjay Raut On Amit Shah| “अमित शाह पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही. देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरु आहे. त्यापेक्षा देशाच्या विरोधकांना संपवा. तुमच्यात हिम्मत असेल तर आपले जवान दररोज शहीद आहेत. तुम्ही कीर्तीचक्र द्याल, पण याने काही होत नाही,” असेही संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut On Amit Shah| हेही वाचा: शेअर बाजाराला आज मोहरम निमित्त सुट्टी ; BSE-NSE मध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत