पिंपरी | तरूण भरकटला तर वाईट परिणाम होतो – सत्यजित तांबे

लोणावळा, (वार्ताहर) – भारत तरुणांचा देश आहे, पण तरुणांना योग्य दिशा मिळाली नाही आणि तो भरकटला तर त्याचा परिणाम वाईट होतो. याचा अनुभव आपण बांगलादेशमध्ये सध्या जे चालले आहे, त्यातून घेत आहोत.
त्यामुळे योग्य वयातच तरुणांना, त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या क्रयशक्तीला योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. लोणावळा महाविद्यालयात आयोजित ‘संकल्प नशा मुक्तीचा’ या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट, लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा पोलीस आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्तीचा’ या चळवळीचा प्रारंभ आणि माहिती पत्रकाचे अनावर करण्यात आले. आमदार सत्यजित तांबे, मावळचे आमदार सुनील शेळके, आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
तसेच लोणावळा काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ऍड. निलिमा खिरे, सहसचिव ऍड. अजय भोईर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, जयहिंद लोकचळवळीचे शहराध्यक्ष चैतन्य वाडेकर, विशाल विकारी, जकीर खलीपा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नशामुक्ती संदर्भात करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तालुक्याची मान खाली जाईल असे काही करू नका
मुंबई नगरीची संस्कृती मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात पसरू लागली आहे. यातून जशा काही चांगल्या गोष्टी घडतात, तशाच नशेखोरी सारख्या वाईट गोष्टी देखील घडत आहेत. मात्र जयहिंद लोकचळवळ ‘संकल्प नशा मुक्तीचा’ या माध्यमातून एक चांगले उद्दिष्ट घेऊन पुढे चालली आहे.
तालुक्यातील युवा पिढीने देखील अशा वाईट गोष्टींपासून दूर राहावे. आपल्या मावळ तालुक्याची मान खाली जाईल, असे काही करू नका, असा सल्ला आमदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्वतःला सकारात्मक विचार असलेल्या मित्रांमध्ये गुंतवून घ्या. नकारात्मक आणि तुम्हाला खाली खेचू बघणाऱ्या लोकांपासून, मित्रांपासून दूर रहा.
हे करीत असतानाच आपल्या आई वडिलांचे आपल्यासाठी घेतले गेलेले कष्ट लक्षात ठेवा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निखिल कवीश्वर यांनी केले. तर प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केले.





