नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाशी रुपवते कुटुंबाची नाळ जोडलेली आहे. आजोबा दादासाहेब रुपवते, वडील प्रेमानंद रुपवते यांनी जे योगदान दिले आहे, त्याच बळावर माझी वाटचाल सुरू आहे. शिर्डीची जागा कॉंग्रेसच्या वाटेला मिळाली तर कॉंग्रेसची उमेदवारी करून निश्चितच विजय मिळवू, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला कॉंग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.
उत्कर्षा रुपवते यांनी नेवासा येथे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तालुक्यातील एकूण राजकीय परिस्थिती, प्रश्न, कॉंग्रेस संघटन व आगामी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी रंजन जाधव, कार्लस साठे, अभिजीत गांधी, राजेंद्र वाघमारे, डॉ.सुरेश झिंजुर्डे आदी उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा या राखीव मतदारसंघातून रुपवते या निवडणूक लढविण्याठी इच्छुक आहेत. त्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. युवक कॉंग्रेसमध्येही त्यांनी काम केलेले आहे. माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आणि प्रदेश कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांची कन्या आहे. शिर्डीची जागा कॉंग्रेसला आली तर उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी फायनलच असणार असे सूतोवाचही यावेळी त्यांनी केले. उत्कर्षा रुपवते यांचा पत्रकार राजेंद्र वाघमारे यांनी सन्मान केला.