विश्रांतवाडी : शरद पवार ईडीच्या नोटीसला घाबरले नाहीत तर तुझ्या पोर्श कार प्रकरणाच्या नोटीसला काय घाबरणार ? असा घणाघाती सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना विचारला. शरद पवार यांनी पोर्श प्रकरणी सुनील टिंगरे यांना “दिवट्या आमदार” असे संबोधले होते. यानंतर टिंगरे यांनी शरद पवार यांना “पोर्श कार प्रकरणी काहीही बोललात अन् बदनामी केली तर कोर्टात खेचू”, अशी नोटीस पाठवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी जाहीर सभेत सवाल केला.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ येरवडा येथे आयोजीत जाहिर सभेत बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ज्यांनी पोर्श कारखाली चिरडून दोन तरूणांची हत्या केली. त्याला आमदाराने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पिझ्झा, बिर्याणी खाऊ घातली हे वास्तव आहे. याबद्दल माझ्यासह अनेकांनी जाहीरपणे प्रश्न विचारत आरोप केले.”
पुढे त्या म्हणाल्या, “ज्या ८० वर्षाच्या योद्ध्याने तुमच्या एबी फॅार्मवर सही केली. ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलात त्याच आदरणीय शरद पवार यांना नोटीस पाठवली. शरद पवार हे दिल्लीतील तख्ताच्या इडीने पाठवलेल्या नोटीसला घाबरले नाहीत तर तुझ्या नोटीसला काय घाबरणार?,” असा घणाघाती सवाल सुप्रिया सुळे यांनी आमदाराला केला.
दरम्यान, येरवडा येथे आयोजीत जाहिर सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार ऍड.जयदेव गायकवाड, मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे,शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, प्रकाश म्हस्के, माजी नगरसेवक हनीफ शेख, संजय भोसले, किशोर विटकर, संगीता देवकर, ऍड अय्युब शेख, जालिंदर कांबळे, लक्ष्मी सोनवणे, सुनिल मलके, सचिन भगत, सागर माळकर, नितीन भुजबळ, आनंद गोयल, अमित म्हस्के, शैलेश राजगुरू, राजू ठोंबरे, रमेश सकट, अमित म्हस्के यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतात. महिलांवर अत्याचार होतात. कायदा व सुव्यवस्था मोडीत काढली आहे. लाल रंगाचं संविधान दाखविणाऱ्यांना फडणवीस नक्सलवादी म्हणतात? जर संविधान हातात घेणाऱ्यांना नक्सलवादी म्हटले जात असेल तर होय, आम्ही नक्षलवादी आहोत. महिला भगीनींसाठी १५०० टिकल्यांची गरज आहे, की सुरक्षेची गरज आहे हा सवालही उपस्थित केला.
बाळासाहेब थोरात यांची टीका
बापूसाहेबांचं विधानसभेतलं काम मी पाहिलेलं आहे. मनापासून जनतेचं काम करणारा कार्यकर्ता म्हणजे बापुसाहेब पठारे आहेत. हे सरकार बेकायदेशीर खोक्यांनी आलेले सरकार आहे. भ्रष्टाचारानी बरबटलेलं सरकार आहे, अशी जहरी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.