“शरद पवारांनी आधीच धडा शिकवला असता तर…”; बीड प्रकरणावरून अंजली दमानियांचे प्रत्युत्तर

Anjali Damania | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यावरुन वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची देखील मागणी केली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बीडमधील या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांनी देखील भाष्य केले आहे.
काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम आज बीडमध्ये आपल्याला दिसत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांना दिली आहे. त्यावर अंजली दमानिया यांनी शरद पवारांना आधी जर नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या आणि तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
‘चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई…’
“धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवलं. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका, अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“बीडमधील पोलिस विभागातील सर्व लोकांना बाहेर काढून त्यांना इतर जिल्हांमध्ये टाकावे आणि तिथे सर्वच पोलिस नवीन आणावीत. पक्षातील नेत्यांनी चुकीचे वागल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, पाठीवर नाव लिहिल्याने काहीच फरक पडत नाही, तिथे सर्वांनाच सर्वांची जात माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये कोणीच कारवाई केली नाही,” असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. Anjali Damania |
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घटनांबद्दल बोलताना दमानिया दिसत आहेत. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या याचेही दमानिया यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा :





