आमचा पक्ष सत्तेवर आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण पुन्हा सुरू करू; कॉंग्रेसचे मुस्लिमांना आश्वासन

बेंगळुरू – कर्नाटकात मुस्लिमांसाठी लागू असलेले चार टक्के आरक्षण भाजप सरकारने रद्द बादल ठरवले होते. पण आमचा पक्ष सत्तेवर आला तर हे आरक्षण आम्ही पुन्हा सुरू करून अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करू असे आश्वासन कर्नाटक कॉंग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी दिले आहे.
मार्चमध्ये, कर्नाटक सरकारने अल्पसंख्याकांसाठीचा चार टक्के कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.ओबीसी आरक्षण विभागातून मुस्लिमांसाठी हे आरक्षण लागू करण्यात आले होते. भाजप सरकारने ते रद्द करून हे चार टक्के वोक्कलिगा आणि लिंगायत समाजाला प्रत्येकी दोन टक्के या प्रमाणे वाटून दिले होते. दरम्यान भाजपकडून अजून उमेदवार यादी जाहीर केली गेली नाही त्यावरही शिवकुमार यांनी टीका केली आहे.
त्यांनी म्हटले होते की, आम्ही दोन उमेदवार याद्या जाहींर केल्या, पण त्यानंतर पक्षात कोणताही वाद उद्भवला नाही, पण भाजपला अद्याप एकही उमेदवार जाहीर करता आला नाही, त्यांना नेमकी कशाची भीती वाटते आहे असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की कर्नाटकात आता कॉंग्रेसचेच सरकार येईल हे निश्चीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर समाजातल्या अन्य घटकांबरोबरच अल्पसंख्याकांच्या हिताचेही रक्षण करू असे ते म्हणाले.





