‘फ्लेक्‍स नाही तर काम पाहून तिकीट दिले जाणार

पुणे – महाजनादेश यात्रेच्या स्वागतानिमित्त शहरात इच्छुक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फ्लेक्‍स लावले आहेत. मात्र, फलकबाजीने कुणालाही तिकीट मिळणार नसून केलेले काम पाहून तिकीट दिले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, प्लेक्‍सबाजी करणाऱ्यांच्या विरोधात पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. शनिवारी (दि.14) शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघात महाजनादेश यात्रा झाली.

यावेळी आमदारकीसाठी इच्छुकांनी महाजनादेश यात्रा जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्लेक्‍स लावले. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्‍त केली. तसेच, या प्रकरणावरून सोशल मीडियावरून टीका केली. तर, काही भागांत कोंडीची स्थिती झाली होती. याबाबत मुख्यमंत्री यांना विचारलेल्या प्रश्‍वावर ते म्हणाले, फ्लेक्‍सबाजी चुकीची असून यामुळे कुणाला तिकीट मिळणार नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर कालच शहराध्यक्षांना सूचना केल्या आहेत. भविष्यात अशी फ्लेक्‍सबाजी करू नये. फ्लेक्‍सबाजी करणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावर झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.